नैसर्गिकपणे वजन कमी करण्यासाठी ८ सूचना

अगदी सहज शक्य आहे, त्यासाठी रात्रीची झोप उडवायची गरज नाही.

“मला वाटते की माझं वजन खूप वाढलं आहे आणि मला बारीक व्हावंच लागेल.” ह्या एका विचाराचे रुपांतर काहीही करून वजन कमी करायचे उपाय शोधण्यामध्ये होते.

शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. पण समजा तुम्हाला एक नैसर्गिक, दुष्परिणाम नसलेला, अत्यंत सुलभ आणि १५-२० मिनिटे घेणारा उपाय मिळाला तर कसं होईल?

सहजपणे बीएमआर कमी करा

जर तुम्ही वजन घटवण्याच्या “मोहिमेवर” असाल तर नियमितपणे BMR *(Basal Metabolic Rate) म्हणजेच  खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर करण्याची गती) तपासण्याची गरज असते. तुम्हाला तुमच्या शरीराचा BMR माहित असेल तर तुम्ही तुमच्या जेवणातील कॅलरीज कमी करू शकता, जेणेकरून वजन आपोआप नियंत्रित राहील. ध्यान केल्याने तुमचे BMR आपणहून कमी होते. म्हणजेच अतिरिक्त कॅलरीज घेण्याचे प्रमाण आपसूकच कमी होते ज्यामुळे वजन आपोआपच कमी होते.

तुमच्या व्यायामाची सवय शिस्तबद्ध असू द्या:

तुमच्या लक्षात आले असेल की जर तुम्ही काही दिवस व्यायाम केला नाहीत तर लगेच तुमचे वजन पुन्हा वाढू लागते. ह्याचे कारण, तुम्ही जेवढे जेवता तेवढ्या कॅलरीज जाळत नाही. व्यायाम केल्याने फक्त तुमची भूक वाढते पण अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होत नाही.

योगाभ्यास केल्याने अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते व जड असलेले अन्न सेवन करण्याची रुची कमी होते. म्हणजेच भूक तर लागते पण थोडेसे खाऊन तृप्ती येते. ह्याचा दीर्घकालीन परिणाम असा होतो की तुम्ही काही दिवस व्यायाम सोडला तरी वजन लगेच वाढत नाही.

तुमचा समतोल पुनर्स्थापित करा.

अवाजवी वजन वाढणे किंवा कमी होणे हा हार्मोन्स (संप्रेरक) असंतुलित झाल्याचा परिणामही असू शकतो. ध्यानसाधना केल्याने शरीरातील सर्व प्रणालींचा ताळमेळ जमून येतो. परिणामी तुम्ही स्थूल असाल तर वजन कमी करता येते किंवा तुमचे वजन कमी असेल तर ते वाढवता येते.

चटकदार खाणे कमी करा.

वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा अडसर म्हणजे लज्जतदार पदार्थ खाण्याची लागलेली चटक. एखाद्या मिठाईच्या दुकानाजवळून जाताना आसपास दरवळणाऱ्या गोड वासामुळे तो पदार्थ घेऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण नियमित ध्यान केल्याने मनावर ताबा ठेवणे थोडे सोपं होते.

ध्यान केल्याने जागरूकता वाढते, आपल्याच खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत सतर्कता वाढते. मग पुन्हा कधीही तुम्ही चॉकलेट किंवा चिप्स घ्यायला जाल तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल की हे खाल्ल्याने माझे वजन वाढेल. मग त्याऐवजी तुम्ही दुसरे काही तरी पौष्टिक पर्याय शोधाल. काही कालांतराने नियमित ध्यान केल्याने तुमच्या इच्छा नाहीशा होतात. मग तुम्ही ते चिप्स किंवा चॉकलेट घेण्यास कधीच जाणार नाहीत.

आपला संकल्प मजबूत असू द्या:

आपली वजन कमी करण्याची मोहीम अर्धवट सोडून देणे किती सोपे असते माहित आहे का? अतिनिद्रा, अरबट चरबट खाणे व गोड पदार्थ ह्यांचा तुमच्या मोहिमेवर परिणाम सहज होऊ शकतो. ही तुमच्या संकल्प शक्तीची परीक्षा ठरू शकते. इथेही ध्यानाचा फायदा नक्कीच होऊ शकतो. ध्यान केल्याने तुमची संकल्प शक्ती वाढते ज्यामुळे व्यायाम करणे, हलका मर्यादित आहार घेणे व चांगल्या सवयी ठेवण्या प्रतीची प्रतिबद्धता वाढते.

ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण करण्याची शक्ती मिळते.

भरपूर भाज्या खा आणि तणाव दूर ठेवा.

ज्या वेळेस तुम्हाला चॉकलेट किंवा इतर अरबट-चरबट खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही थोडा विचार करा की मी हे का खात आहे? घरचा किंवा कामावरचा काही तणाव विसरण्यासाठी मी हे खात आहे का? मनातील तणावामुळेही वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा होत राहते. ह्यामुळे थोडा फार तणाव निवळतो पण ध्यान केल्याने खोलवर जमा झालेला तणाव नैसर्गिकरित्या निवळू लागतो. ध्यान करणे ही नैसर्गिकरित्या तणाव निवारणाची व त्याच बरोबर वजन नियंत्रित ठेवण्याची उत्तम पद्धत आहे.

वजन कमी करण्यासाठी वेळ देण कठीण होतेय का?

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामाला वेळ देता येत नसेल तर ध्यान करणे हा रामबाण उपाय ठरू शकतो. ‘ध्यान केल्याने दिवसाभरात जास्त वेळ मिळु लागेल’ आणि ध्यान करण्यासाठी फक्त १५-२० मिनिटे लागतात. दिवसभरात तेवढा वेळ काढणे सहज शक्य आहे नाही का?  तुमच्या शरीराला तेवढा वेळ देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तुमची कार्यक्षमता प्रचंड वाढते, ह्याचा परिणाम म्हणजे तुम्ही कोणताही काम लवकर आटपू शकता. परिणामी वजन घटवण्याच्या मोहिमेला जास्तं वेळ देऊ शकाल.

स्वत:चेच लाड करा

विचित्र वाटतंय? पण प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा आपणच आपला लट्ठपणा स्वीकारलेला आहे तर मग वजन कमी करण्याची गरजच काय? ह्याचे उत्तर असे की अशी स्वीकृती आली की मन शांत होते आणि चिंता करणे थांबते. अशा मनस्थितीमुळे वजन कमी करण्याकडे जास्तं लक्ष देता येते, आणि तुम्ही केलेले प्रयत्न जास्तं परिणामकारक ठरतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!