आल्याचे हे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म सर्वांना माहीत असलेच पाहिजेत!

आलं घातलेला मसालेदार कडक चहा कोणाला नाही आवडत? त्याचप्रमाणे आलेपाकच्या वड्या, सुंठ घातलेलं औषधी दूध हे सर्व आपल्या रोजच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झालेलं आहे. एवढं सगळं असलं तरी काही घरगुती उपयोग सोडले तर आल्याचे वेगवेगळ्या रोगांमध्ये औषध म्हणून होणारे उपयोग खूपच कमी लोकांना माहीत असतात. आज आपण जाणून घेऊयात बहुगुणी आल्याचे काही उपयोग.

आल्याचा परिचय

आयुर्वेदिक औषधामध्ये आल्याचा कंद वापरतात. आलं आणि सुंठ हे एकच आहेत. आलं हे एक कंद आहे. त्याची साल काढून ते वाळवलं की त्याच सुंठ बनतं. सुंठेलाच शुंठी असंही म्हटलं जातं. आल्याची साल काढून वाळवलं की सुंठ बनते. वाळल्यामुळे सुंठ दुधी रंगाची बनते. दक्षिण भारतात काही ठिकाणी आलं पांढऱ्या रंगाचे असते. प्रक्रिया केल्यामुळे सुंठ आल्यापेक्षा पचायला हलकी असते. काही ठिकाणी आलं दुधामध्ये उकळवून नंतर वाळवून त्यापासून सुंठ बनवली जाते.

आल्याचा नाममहिमा

भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आल्याला आर्द्रक असं नाव आहे. मराठी मध्ये या आर्द्रकापासूनच अपभ्रंशाने आलं असं सुटसुटीत नाव वापरात आलं असावं. प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आल्याची आलेली काही संस्कृत नावं बघण्यासारखी आहेत –

कटुग्रंथि, कटुभद्र, कटूत्कट – आलं हे चवीला तिखट आणि थोडंस कडवट असल्यामुळे आलेली नावं.

विश्व, विश्वा, नागर, विश्वभेषज, विश्वौषध – आलं हे त्यातील औषधी गुणधर्मामुळे जगप्रसिद्ध असल्यामुळे आलेली ही नावं.

कटूषण, उष्ण – आल्याचा मूळचा गुणधर्म हा उष्ण म्हणजेच आलं हे गरम पदार्थ असल्यामुळे आलेली ही नावं.

शुंठी – शुंठी या नावावरूनच मराठीतलं सुंठ हे नाव प्रचलित झालं.

शृङ्गवेर – आल्याचा कंद ओबडधोबड असल्यामुळे त्याच्या आकारावरून आलेलं नाव.

आर्द्रक, शोषण, कफारी – आलं हे कफ कमी करण्यामध्ये अत्यंत गुणकारी आहे या विशिष्ट कार्यामुळे मिळालेली नावं.

आल्याला वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. हिंदी मध्ये अद्रक, सोंठ, गुजराती मध्ये सुंठ किंवा आदु, तामिळमध्ये अल्लम किंवा सोटी, बंगाली मध्ये आदा तसेच सोंठ, अरबी भाषेत जंजबिल, फारसी भाषेत शंगवीर, अदरख आणि इंग्लिश मध्ये जिंजर इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.

झिंजिबेर ऑफिशिनॅले हे आल्याचं शास्त्रीय नाव आहे. हे नाव संस्कृत मधल्या शृंगबेर या नावपासून पडलं असल्याचं म्हटलं जातं.

आल्याचं स्वरूप

भारत भरात सगळीकडे आल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आल्याच्या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान खूपच सोयीचं आहे. भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि बंगाल मध्ये हवामान आल्यासाठी पोषक असल्यामुळे या भागात आल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं.

साधारण एखाद्या मोठ्या झुडपासारखे असणारे आल्याचं रोप उंचीला एक ते दीड मीटर उंच असतं. आल्याचं रोप साधारणपणे 2 मीटर परिघात पसरू शकते. रोपांची पानं टोकाशी निमुळती होणारी आणि लांब असतात. पानांची लांबी 30 ते 32 सेमी असू शकते. रोपाच्या मधल्या भागात फुलांचा दांडा येतो. फुलांचा दांडा साधारण 10 सेमी इतका उंच असू शकतो. त्यावरील फुले गडद जांभळ्या रंगाची असतात.

आल्याचे गुण

आल्याची चव कडवट तिखट अशी असते. आलं हे उष्ण असतं. याच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढते. आलं हे वात आणि कफाच्या रोगात अतिशय गुणकारी ठरतं. आता पाहुयात आल्याचे इतर काही औषधी उपयोग.आलं चवीला तिखट असतं आणि ते गुणाने उष्ण असतं.

आल्याचा बाह्य उपयोग

आल्याचा रस किंवा सुंठ चूर्ण करून त्वचेवर लावलं तर त्या जागी जळजळ जाणवते. त्या जागी गरम स्पर्श जाणवतो. त्यामुळेच आलं गरम आहे असं म्हटलं जातं.

सर्दीच्या त्रासात, सर्दीमुळे डोकं दुखणे, सायनसच्या त्रासात कपाळ, नाक आणि गालावर सुंठ आणि दूध यांचं मिश्रण करून त्याचा लेप लावला जातो. यामुळे अडकलेला कफ पातळ होऊन बाहेर पडतो आणि सर्दी आणि डोकेदुखी मध्ये आराम पडतो.

काही वेळा थंडी वाजून अंगात ताप भरतो अशा वेळी पूर्ण अंगावर आल्याचं चूर्ण किंवा आल्याचा रस लावला जातो. यामुळे थंडीपासून थोडा आराम पडतो. त्याच प्रमाणे शरीर थंड पडत असेल तरी अंगावर सुंठेचं चूर्ण चोळण्याचा उपाय सुचवला जातो. काही कारणामुळे शरीराच्या एखाद्या अंगाला बधिरता आलेली असेल तरी तिकडे आल्याचा रस किंवा चूर्ण यांचा लेप लावला जातो. अति प्रमाणात घाम येत अस्वल तर सुंठेचं चूर्ण घसण्याचा उपाय सुचवला जातो.

आल्याचा लेप हा सूज कमी करून वेदना कमी करणारा आहे. सांधेदुखी, सांध्यात सूज येणे, सांधे जड वाटणे या अवस्थे मध्ये आल्याचा रस किंवा चूर्ण चोळतात. सुंठेचं चूर्ण तेलामध्ये मिक्स करून सांध्यांवर चोळल्याने आराम पडतो.

आलं पोटात घेतल्याने होणारे फायदे

भारतीय प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की आलं आणि सुंठ यांचं चूर्ण वेगवेगळ्या रोगांमध्ये उपयोगी आहे. जाणून घेऊया असेच काही उपयोग.

पाचनसंस्थेमध्ये उपयुक्त

आलं आणि सुंठ पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. तोंडाला चव नसेल तर चव येण्यासाठी उपयोगी आहेत. अंगात जडत्व असेल तर ते दूर करण्याचं काम आलं आणि सुंठ करू शकतात. आल्याची पेस्ट गरम पाण्याबरोबर घेतल्यास पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. पोट जड झालेलं असेल, अपचन असेल तर ताकातून आल्याची पेस्ट घेतल्याने पचनास मदत होते. भूक लागत नसेल तरी हा उपाय केला जातो. अपचन असेल तर आलेपाक दिला जातो. आल्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन त्यात सैंधव टाकून घेतल्यास थोड्या वेळाने कडकडून भूक लागते. त्याचप्रमाणे आलं आणि लिंबाचा रस घेतल्यास जुलाबामध्ये आराम पडतो. एक वाटी दही घेऊन त्यात 8 ते 10 चमचे आलं आणि लिंबाचा रस टाकून घेतल्याने जुलाब थांबतात. मळमळ असेल तर सुंठेच चूर्ण किंवा आल्याचा रस घ्यावा. मूळव्याधीचा त्रास असेल तरी आलं उपयुक्त आहे. लोण्यातून सुंठ चूर्ण किंवा आल्याचा रस घेतल्याने मूळव्याधीत आराम पडतो. पोट साफ होत नसेल तर सुंठ चूर्ण आणि चमचाभर तूप घेतल्याने आराम पडतो.

श्वसनसंस्थेसाठी आल्याचे फायदे

तिखट चव आणि उष्ण असल्यामुळे आलं आणि सुंठ वाढलेला कफ कमी करण्याचं काम करतात. सर्दी, खोकला, दम लागणे या रोगांमध्ये सुंठेच चूर्ण किंवा आल्याचा रस मधातून घेतात. घश्यात घट्ट कफ असेल तर तोंडात सुंठेचा तुकडा ठेऊन चघळला जातो त्याने कप सुटतो आणि खोकला कमी होतो.

रक्तवाहन मध्ये उपयुक्त

रक्तशुद्धी साठी आलं आणि सुंठ यांचा उपयोग होतो. यांच्या वापरामुळे सूज कमी होऊन रक्तातील कप कमी होण्यास मदत होते. ह्रदयाला उत्तेजना मिळून ह्रदयाची अशक्तता दूर होते आणि रक्ताभिसरण सुधारते.

यांच्या साठी वापर निषिद्ध 

उष्णतेचा त्रास, शरीरात जखम, रक्तस्त्राव होत असेल, तसेच उन्हाळ्यामध्ये सुंठ आणि आल्याचा वापर जास्त प्रमाणात करू नये. याच्या उष्ण गुणधर्मामुळे लक्षणांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.

आम्हाला आशा आहे आपल्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या आल्याचे हे गुणधर्म आज आपल्याला नव्यानेच कळले असतील. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आम्हाला फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!